ज्ञानप्रकाश बालविकास केंद्र, लातूर
मातृभाषेच्या प्रभावी माध्यमातून मुलांचं शिकणं सहजतेनं घडतं याचा अनुभव संस्थेचे प्रमुख श्री. सतीश नरहरे सर 1989 पासून नरहरे क्लासेसच्या माध्यमातून गणित विषयाचे अध्यापन करत असताना घेत होते. बालशिक्षणात प्रयोगशीलता असावी, मुलांचं शिकणं आनंददायी व ताणविरहित व्हाव, त्यांना शिकण्यातला आनंद समजावा, आपण होऊन शिकावंसं वाटावं, प्रश्न पडावेत, उत्तरांचा शोध घेता यावा, मोकळेपणाने आपल्या भावना व्यक्त करता याव्यात या उद्देशाने सविता व सतीश नरहरे यांनी 1999 मध्ये स्वतःच्या मुलाला प्रवेश देऊन ज्ञानप्रकाश ची सुरुवात केली. 26 मुलांच्या गटाने सुरू झालेल्या या प्रकल्पात आज बालगटापासून दहावीपर्यंतचे जवळपास 1000 मुले शिकत आहेत. मागील 25 वर्षांपासून अभ्यासक्रम, मूल्यमापन, उपक्रमातील नाविन्य व सातत्य तसेच काटेकोरपणे पाळलेली वर्गातील मर्यादित विद्यार्थी संख्या यामुळे बालभवन, बालविकास केंद्र, विद्यानिकेतन व नरहरे लर्निंग होम अशा चार विभागात चालणारे ज्ञानप्रकाश हे बालशिक्षणातील अभिनव केंद्र बनले आहे. दोन शिक्षकांपासून सुरुवात झालेल्या ज्ञानप्रकाशशी आज 65 प्रयोगशील शिक्षक जोडले गेले आहेत. मराठी माध्यमाच्या ज्ञानप्रकाशमध्ये प्रवेशासाठी अनेक मुलांची नावे प्रतीक्षायादीत असतात. ही प्रतीक्षायादी वाढतच आहे. भौतिक सुविधांची कमतरता असूनही हा पालकांनी ज्ञानप्रकाशच्या कार्यपद्धतीवर दाखवलेला विश्वास आहे. आज लातूरच्या शैक्षणिक जगतात ज्ञानप्रकाशचं वेगळं स्थान निर्माण झालं आहे; त्याचं कारण आहे आस्थेने धडपडणारे शिक्षक, उत्कट प्रतिसाद देणारी मुलं आणि ज्ञानप्रकाशच्या कार्यावर प्रेम करणारे असंख्य पालक व हितचिंतक.
संगीत हा ज्ञानप्रकाशचा आत्मा आहे. बालभवनपासून नरहरे लर्निंग होम पर्यंत चारही विभागांची प्रार्थनासभा ही पूर्णत: संगीतावर आधारित असते. अखिल भारतीय गांधर्व मंडळाच्या संगीताच्या दोन परीक्षांची तयारी ही प्रार्थनासभेतच होते आणि या परिक्षा ज्ञानप्रकाश संगीत विद्यालयात घेतल्या जातात. विविध प्रार्थना, सणोत्सवाची गाणी, लोकगीते, अभंग, भारूड, देशभक्तीपर गीते अशी जवळपास शंभर ते दीडशे गाणी मुले तालासुरात म्हणतात. प्रार्थना सभेत मुलांना भेटण्यासाठी विविध क्षेत्रांतील मान्यवर येतात. लहान मुलांशी गप्पागोष्टीतून तर मोठ्या मुलांशी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून संवाद साधतात. आठवी, नववी दहावीची मुले त्यांच्या कार्यक्षेत्राची माहिती जाणून घेण्यासाठी काही पाहुण्यांना लर्निंग होममध्ये निमंत्रित करून मुलाखतही घेतात. अनेकांच्या भेटीतून सहवासातून मुले अनुभवसंपन्न होत आहेत.
ज्ञानप्रकाशमध्ये विज्ञान व पर्यावरणविषयक जाणिवा वाढीस लागण्याच्या हेतूने विविध उपक्रम घेतले जातात. 2016 ची लातूर मधील भीषण पाणीटंचाई पाहता मुलांनी आपल्या कुटूंबाचे पाणी बजेट तयार केले व पाच लीटर मध्ये आंघोळीचा संकल्प करून जवळपास लाखो लीटर पाण्याची बचतही केली. उन्हाळी सुट्टीपूर्वी पक्षांना चारा व पाणी ठेवून तर दिवाळी सुट्टीसाठी जाताना आकाश कंदीलारोहण करून फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचे मुले ठरवतात. शाळेच्या परिसराशी आणि पर्यायांने समाजाशी मुलं जोडली जावीत या हेतूने काही विशेष उपक्रमांचं नियोजन केलं जातं. यात जेष्ठांशी त्यांच्या बालपणाबद्दल संवाद, त्यांना शाळेतील कार्यक्रमासाठी निमंत्रित करणं, कचरा व जलव्यवस्थापनासाठी घराघरात संदेश देणं, मतदान करण्यासाठी आवाहन करणं, स्वच्छतेचा संदेश देणं अशा अनेक कारणांनी मुले परिसरातील घराघरांत पोहोचली आहेत. त्यामुळे त्यांनाही प्रकल्प आपलासा वाटतो.
सामाजिक जाणिवेसह संवेदनशील मने निर्माण होण्यासाठी पूरग्रस्त, भूकंपग्रस्त, जलयुक्त लातूर तसेच दिव्यांगांसाठी काम करणार्या मनोबलसारख्या सेवाभावी संस्थांच्या मदतीसाठी मुलांनी निधी उभारला आहे. अशा उपक्रमांतून अनेक सेवाभावी संस्थांच्या कामांची ओळख मुलांना होत आहे. मुलांचं शिकणं ही अविरत घडणारी प्रक्रिया आहे. शिक्षक व पालकांनी केवळ सोबती व्हावं.
अभ्यासक्रमाच्या चौकटीत राहूनही शिक्षकांना मुलांचे अनुभवविश्व समृद्ध करण्याचे स्वातंत्र्य मिळू शकते; याचाच एक भाग म्हणजे शिक्षकांनीे मुलांसाठी दिलेले प्रकल्प विषय. मागील 25 वर्षांत बालगटापासून दहावीपर्यंतच्या मुलांनी प्रकल्प प्रदर्शनातून अनेक विषय मांडले आहेत. लहानमुले आई-बाबांच्या मदतीने तर मोठी मुले स्वत: त्यावर काम करतात. त्यात सेंद्रीय शेती व कीटकनाशके, प्लास्टिकचा पुनर्वापर, औषधी वनस्पतींचा उपयोग, भाषिक व गणिती खेळ, मुलाखत, विज्ञान प्रयोग, जीएसटी, शेअर मार्केट, अर्थसंकल्प, Money market, Digital currency, RBI, Income Tax असे वैविध्यपूर्ण विषय अभ्यासपूर्वक मांडले आहेत. यासोबतच आजी आजोबांच्या काळातील पारंपरिक वस्तूंचे प्रदर्शन आणि त्या काळातील पारंपरिक व्यवसाय करणार्या बलुतेदारांची कामेही या काळात प्रदर्शनातून मुलांना पाहता आली. ज्ञानप्रकाशच्या अशा प्रकल्प प्रदर्शनांना शिक्षण प्रेमी, विद्यार्थी, शिक्षक, पालक मोठ्या संख्येने भेटी देतात व कौतुकही करतात. या काळात प्रकल्प मांडणीपासून प्रत्येक विषयाची माहिती देणं, नियोजन करणं, येणार्या लोकांची व्यवस्था पाहणं, स्वच्छता अशा सर्व कामांत मुलांचा सहभाग असतो. मुलांची व्यवसायकौशल्ये विकसित होण्यासाठी ज्ञानप्रकाशाने जाणीवपूर्वक काही उपक्रमांचे नियोजन केले आहे. यात आनंदनगरीत खाऊ बनवणं व विकणं, भाजी प्रकल्पातील भाजी विक्री, गांडूळ खत निर्मिती व विक्री तसेच पुस्तक प्रदर्शनातील पुस्तकांची विक्री. यातून व्यवहार ज्ञानाबरोबरच स्वत: कृती करून शिकण्यामुळे अनेक अनुभव मुलांच्या कायम स्मरणात राहतात. ज्ञानप्रकाशच्या भाजीप्रकल्पात लहान मुले वेगवेगळ्या पिकांची माहिती घेतात तर मोठी मुले रोपं तयार करून प्रदर्शनातून विक्री करतात. त्यातून मिळालेल्या नफ्यातून मुलांनी शाळेसाठी अनेक भेटवस्तू दिल्या आहेत.
ज्ञानप्रकाशने स्नेहसंमेलनातूनही मागील वीस वर्षांपासून विविध विषयांचे सादरीकरण केले आहे. ज्ञानप्रकाश मधील प्रत्येक मूल, शिक्षक तसेच वाहन चालकांचाही स्नेहसंमेलनामध्ये सहभाग असतो, हे ज्ञानप्रकाशचं वैशिष्ट्यच आहे. आनंदाच्या गावा, शिवोत्सव, रंगोत्सव, बहुरंगी बहर, पाऊसगाणी, सुंदराचा वेध लागो, आनंद तरंग, भारत की संतान, अवघा रंग एक झाला अशा शीर्षकांसह दर्जेदार स्नेहसंमेलने झाली आहेत. प्रत्येक स्नेहसंमेलनात स्टेजवरील सादरीकरणापासून संहिता लिहिणं, गाणी निवडणं, सूत्रसंचालन लिहिणं व करणं, सभागृहातील स्वच्छता व पालकांची व्यवस्था पाहणे अशा अनेक कामांत मुलांचा सहभाग असतो. यात अनेक वेळा मुलांची मते जाणून घेऊन त्यांचा आदर केला जातो व सर्वसंमतीने निर्णय घेतले जातात.
बालगटापासून दहावीपर्यंत ज्ञानप्रकाशच्या सहलींचे वयोगटानुसार वेगळे स्वरूप असते. बालगटांची सहल कधी ट्रॅक्टर व बैलगाडी तर कधी पायी किंवा उंटावरूनही असते. कधी मोठ्या गाडीतून जवळच्या नदीवर तर कधी टेकडीवर चढण्याच्या अनुभवाची असते. मोठ्या मुलांना सहलीत पालकांची शेती, हेमाडपंथी मंदिरे, वस्तुसंग्रहालये, नदी व नदीवरील धरणे पाहता येतात. तीन ते चार दिवसांच्या सहलीत मुले विविध ऐतिहासिक व सामाजिक प्रकल्पांना भेटी देतात. मोठ्या वर्गांची मुले जंगल सफारी आणि ट्रेकिंगही करतात. यात मोठ्या मुलांनी महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई शिखर अनेक वेळा सर केले आहे. काही वेळा मुले व पालकांची एकत्रितही सहल असते.
अशा विविध उपक्रमांत सहभागी होणारी मुले जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय क्रीडास्पर्धेतून बक्षीसे मिळवत आहेत. ज्ञानप्रकाशने विशेष ठरवलेल्या भारतीय खेळांमध्ये मल्लखांब, योगासन, कबड्डी, खो - खो यांतून मुले आता राज्यस्तरावरही खेळत आहेत. तसेच वक्तृत्व स्पर्धा बालनाट्य स्पर्धा, जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शन, समूहगीत गायन, अशा अनेक स्पर्धांतून अनेक बक्षिसे मिळवत आहेत. शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय विद्यालय परीक्षा, होमी भाभा, सातारा सैनिक स्कूल अशा विविध स्पर्धा परीक्षांतून दरवर्षी अनेक मुले निवडली जात आहेत. दहावी बोर्डाचा निकालही दरवर्षी शंभर टक्के आहे. कोवीड काळात मुलांच्या अभ्यासवर्गाबरोबरच पालकांसाठी ऑनलाईन कार्यशाळांचे आयोजन केले. यात जेष्ठ मनोविकास तज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांचे पूल बांधू संवादाचे, जेष्ठ लेखिका व चित्रकार माधुरी पुरंदरे यांचे लिहावे नेटके या पुस्तकावर आधारित कार्यशाळा, श्री निलेश घुगे यांची भविष्यवेधी शिक्षण कार्यशाळा तसेच गोष्टींची कार्यशाळा याबरोबरच शिक्षकांच्या आवजातील गोष्टींच्या पुस्तकाचे ऑडीओ क्लिप मुलांनी कुटूंबासह ऐकले.
ज्ञानप्रकाशची मुले बहुअंगाने बहरावीत यासाठी शिक्षक मुलांच्या वाचन व लेखनाकडे विशेष लक्ष देतात. प्रार्थना सभा व वर्गातून ताई करत असलेल्या प्रकट वाचनामुळे मुलांची वाचनातील आवड चांगलीच वाढली आहे. इयत्ता 1 ली ते 5 वीच्या मुलांना वाचण्यासाठी किशोर अंक दिला जातो. वाचणारी मुले लिहिती झाली आहेत. मुलांच्या कथा, कविता विविध मासिकांमधून येत आहेत. ज्ञानप्रकाश मधील मुलांच्या व्यक्तिमत्व विकासासोबतच शिक्षकांचे व्यक्तिमत्व विकसित व्हावे यासाठी विविध कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग, चर्चासत्र, परिसंवाद व शिबिरांचे आयोजन संस्था करते. ज्ञानप्रकाशचा प्रत्येक दिवस मुलांसाठी व ताईंसाठी चैतन्यमयी असतो. अनेक उपक्रम घेत असताना त्यांची केवळ रेलचेल होऊ नये याची विशेष काळजी घेतली जाते. प्रत्येक उपक्रमातून सहजतेने मुलांची जडणघडण होण्याकडे विशेष लक्ष दिले जाते.
स्वतंत्रपणे विचार करणं, कल्पनांच्या विश्वात विहरता येणं, आपल्या भावभावना व्यक्त करणं, वेळोवेळी येत असणार्या समस्यांचे निराकरण करता येणं, परस्परांशी व स्वतःशी संवाद साधता येणं, आत्मविश्वास निर्माण होणं, हे सर्व मातृभाषेतून शिकण्याने सहज शक्य होते. कुठल्याही शासकीय अनुदानाशिवाय चालणार्या ज्ञानप्रकाशचा बालभवन ते सुविधांयुक्त लर्निंग होमपर्यंतचा हा प्रवास सुकर होत झाला आहे तो मागील 34 वर्षांपासून स्वत:चे वेगळेपण जपून गुणवत्ता सिद्ध केलेल्या नरहरे सरांच्या नरहरे क्लासेसने दिलेल्या आर्थिक पाठबळाने व त्यांनी घेतलेल्या शैक्षणिक ध्यासाने. अनुशासित, चारित्र्यवान, समर्पणशील युवा पिढी घडवण्याच्या उद्देशाने आनंददायी व अर्थपूर्ण बालशिक्षणाचा ध्यास घेतलेल्या ज्ञानप्रकाशचा हा 25 वर्षांचा प्रवास !
